Thursday, December 29, 2022

नव वर्षा....

नवीन वर्षा.. 

हासत ये ...बागडत ये ,
उत्साह आनंद ,पखरीत ये.

तेजाळून ये...बहरून ये,
आरोग्य स्वास्थ्य, फुलवीत ये. 

जनातून ये.. मनातून ये
आश्वासक ऐश्वर्य, उधळीत  ये.

आकाशातून ये...जलातून ये,
 ज्ञान विज्ञान, उगवीत ये .

स्वानंदे ये ...स्वच्छंद ये ,
भक्ती सुगंध ,दरवळीत ये.

सांतातून ये...अनंतातून ये,
चिरंतन मंगल, जागवीत ये.

डॉ.सदानंद चावरे
( ३१-१२-२०२२------१-१-२०२३)

Monday, November 21, 2022

आता अमृताची वेळ

आता अमृताची वेळ...

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेताना,संत तुकाराम महाराज वैकुंठी जात असताना ,त्यांची भावावस्था काय असू शकेल त्याचा  मागोवा.


टिळा लागला भाळावर,
आता अमृताचि वेळ
रत्नजडित हरीचे मुख
दिसो लागले आम्हास..( आता अमृताची वेळ)

सोहं शब्द कानी आला
विठू नयनी दाटला
अवघा आनंद सोहळा
 भरूनी उरला अंतरंग..( आता अमृताची )

स्मित उमलून आले
रत्न तेज फिकुटले
ध्यान देवाचे लागले
द्यावा निरोप आम्हास...(आता अमृताची वेळ)

डॉ सदानंद चावरे पुणे.

Wednesday, November 9, 2022

कृष्ण राधा

आदिपुरुष प्रकृति गोविंद राधा 
अधरी पावा तल्लीन मुद्रा.

स्त्रवते बासुरी  सुस्वर जीवनाचे 
अद्वैत ध्यान मनी लागले रे.

सप्त सुरांनी मंद पाझरावे
जीवन संगीत बहरून यावे.

हर एक जीवा लय सापडावी
साध्य जीवनाचे उमगावे हृदयी .

सदानंद.

Thursday, September 22, 2022

Emotions... whirlpool

Man ever locked in grip of emotions
Twisting turning gripping clutching
Submerged well beneath subconscious
Roots and tentacles grounding him
To base reality of being Human
Wiry confusions and whirlwinds within
Eye of knowledge and wisdom
Liberating mind like branches spreading up
Surpassing Darkness stretching oneself to Light
That enlightens everybody all the time.

Painting by Nishant Shah

Wednesday, August 31, 2022

गणेश वंदन

प्रसन्न वदन गणेशा,दर्शन तव घडावे,
खिन्नत्व दैन्यत्व सारे,सत्वर विरून जावे.

चित्त भ्रम  सारे,ज्ञानरूपें निवारून घ्यावे,
ध्येय ज्याचे त्याला,हृदयी स्वच्छ आकळावे.

श्रवण चिंतन वाचनें,मति प्रकाशा उजळावे,
दुर्वांकुर रस औषधे, ज्ञान पचनी पडावे.

बारीक तव नेत्रें , सूक्ष्म निरीक्षण घडावे,
मर्म सारे जीवनाचे, उलगडून समजून यावे.

ज्ञान कला कौशल्ये,मन समृद्ध बनावे,
रसमय आस्वादक रसिकतेने,सुसंस्करण नित्य घडावे.

नृत्य गायन वादनें ,जीवनी रंग भरावे,
शांत शालीन सात्विकतेने,आनंदा भरते यावे.

हाती प्रसाद मोदकाने,परीपूर्ण पोषक व्हावे,
सार्थक  सा-या जीवनाचे,तव पदी नित्य रहावे.
डॉ सदानंद चावरे.

१-९-२०२२

Wednesday, August 17, 2022

कृष्ण

कृष्ण....

लहानपणा पासून भेटत राहिला,तो कृष्ण अनोखा होता,
हरेक टप्प्यावर स्वच्छ नवी,अनुभूती निराळी देत गेला.

खोड्यांनी यशोदेला छळणारा, गोप गळ्यात ताईत होता,
गोकुळावर छत्र मायेचे धरणारा, गोवर्धन गिरीधारी झाला.

मथुरेला गेलेला कृष्ण,कंस उच्छेदक बनला,
राज्यकारण धुरंधर सावधानी,प्रसंग ओळखून होता.

रण सोडून पळाला ,द्वारकेचा राणा झाला,
समयोचित नीती ठरवणारा,दुष्ट परिहारक झाला.

ज्ञान धर्म संस्कृती जाणून,थोर उपदेशक झाला,
हृदयी कोमलता बाळगून,रणी कर्तव्य कठोर उरला.

गोकुळी रास रचैता,रणी संहारक संरक्षक बनला,
सहज वावरला तो,रंग अनोखे दर्शवून गेला.

पुत्र,पति, मित्रत्वाच्या, व्याख्या लिहीत गेला,
प्रेमाची संहिता नवी,राधेसंगे रचून गेला.

जय श्रीकृष्ण.

सदानंद चावरे
१८-८-२०२२

Monday, August 1, 2022

लक्ष्य

कोण निर्मितो हिरवाई
प्रकाशूनि चैतन्य भरी
लक्ष देऊनि पहाण्यासी
मजसि प्रवृत्त करी.

वेध घेता अंतरी
अंबर आले उतरुनी
मोजता अवकाश हृदयी
निजबोधे अमृत शिंपी.

इवलासा मी पक्षी
लक्ष लाविले अलक्षी
नजर शोधता माझी
उमजेल तुम्हां काही


पारदर्शिका :- जयदीप लिमये
शब्द:- सदानंद चावरे
२-८-२०२२

Friday, June 24, 2022

क्षण..

क्षण...

घटिका पळे काळ चालताहे,सवे आपुल्या सदा नित्य धावे.
करावे कसे सार्थक या क्षणांचे,मनी मानसी प्रश्न ऊठताहे.

सुकृत कोणते कसे आकळावे,कुणास ठावे कुणा अनुसरावे.
सत्कर्म कार्या कसे उचलावे,अखंडित सत्कार्य कैसे करावे.

रंजन स्वजनांचे करीत जावे,निज व्यवसाय जपत असावे.
कण ज्ञानाचे मेळवीत जावे,सार्थक यांसी कैसे म्हणावे.

गप्पा टप्पा गणगोत जमवावे,हास्य विनोद फुलवीत जावे.
गेल्या क्षणांना कसे जुळवावे,अखंड समाधान कोठे मिळावे.

स्वर जीवनाचे कैसे जुळावे,समाधान चित्ती कसे उतरावे.
जग पाहता पाहता वीसरावे,अंतरी जरा मनहे स्थिरावे.

हरी कीर्तनी क्षणे ज्या खपावे,सद्गतीस त्याने जीवास न्यावे.
क्षणानेही जिथे विरून जावे,महद्भाग्य ऐसे समस्तां मिळावे.

जय जय रघुवीर समर्थ.
सदानंद चावरे पुणे
२५-६-२०२२

Monday, June 20, 2022

कृष्ण माझा गुरु

कृष्ण माझा गुरु, कृष्ण पैल पारू
भव सागरीचे तारू , कृष्ण माझा||१||

कृष्ण गगनी  मेघु,लखलखता वीज लोळू
मनी गुह्य विमळू , कृष्ण माझा ||२||

नामी नाम जपु , उमलून येई आनंदू
रणी गुरू राऊ, कृष्ण माझा|| ३||

अर्जुनासी सखा बंधु, भक्त कृपे सादरू
भव सागरा आवरू, कृष्ण माझा||४||

गीता अमृत वर्षावु, संत सज्जन उद्धरू
नीती न्याय दंडकु , कृष्ण माझा||५||
डॉ सदानंद चावरे पुणे

Sunday, May 8, 2022

स्व

'स्व' ची ओळख होता ,जीवन स्वप्न विरून जावे.
ओळख 'त्याची' होता ,चिरंतनी विरघळून जावे.
नि:शब्द शांतता उरी दाटता,शब्दांनी जणू मूक व्हावे.
आस 'त्याच्या ' कृपेची लागता,ढग बनून त्याने बरसून जावे.
डॉ सदानंद चावरे.
९-५-२०२२

Saturday, April 16, 2022

हनुमान जन्मोत्सव

सदा रामरूपी लागले  ध्यान 
बळवंत धैर्यवंत असे हनुमान.

चिरंजीव विशाल रूप चिरंतन
भक्तांसी राम भक्तीचे देतसे निधान.

अखंड कृतीशील समर्पित जीवन
राम चरित्राचे सदा जपी गुणगान.

सगुण निर्गुण जेथे एकरूप
बलभीमरूपासी करितो विनम्र वंदन.

हनुमान जन्मोत्सव.
१६-४-२०२२
 डॉ.सदानंद चावरे पुणे.

जय जय रघुवीर समर्थ.

Saturday, February 26, 2022

युद्ध

युद्ध...

सांगा मजला युद्धाने काय साधले
देश बुडाले उद्ध्वस्तच झाले.
||धृ||

शतकांचे संचित जळून गेले
संस्कृती चे कापही नुरले.
रस्तो रस्ती फिरत रहाती
ओळख पुसले चेहरे.||१||

घरे पडता मने कोळपली
अश्रूतर थिजून गेले
गतस्मृतींच्या आठवणींना
कवटाळून बसणे उरले.||२||

कोण फुंकितो शंख रणीचा
भाले फेकी मारी कोणी.
दोन्ही पक्षांत उरती
पार्थिवांच्या गोणी. ||३||

विजयी कोणी परास्त कोणी
कोण लिहीतो अभद्र वाणी.
लल्लाटीच्या भयाणरेषा
वाचू न शकतो कोणी.||४||

डॉ. सदानंद चावरे 
२६-०२-२०२२







Wednesday, February 9, 2022

स्वप्नं

स्वप्नं...

स्वप्नं असतातच गोजिरी
स्वतःशी हितगूज करणारी.

स्वप्नातलं एक जग असतं
वास्तवापेक्षा हटके असतं.

स्वप्नात मिळते निराळी अनुभूती
मिळतो निराळा दृष्टिकोन.

स्वप्नात मन मुक्त असतं
तरल हलकं होत जातं.

स्वप्नं गुंगवून ठेवतात
संपू नये वाटतं.. तरी संपतात.

स्वप्नं झोपेला उद्देश्य देतात
अस्तित्वाला नवी मीती परिमाण देतात.

९-२-२०२२
सदानंद.

Monday, January 10, 2022

बनशंकरी

बनशंकरी...

पुष्प लतांच्या माळा रुळती 
शिळा गंडकी भव्य मूर्ती
सिंह वाहना वरी बैसली
उग्र भाव मुखावर ल्याली

शक्ती रुपिणी मळवट भाळी
सुरवर रक्षिणी, दैत्य हारिणी
भव्य दिव्य प्रखर रूपिणी
नमन आमुचे असो तव चरणी.

सदानंद चावरे
१०-१-२०२२


निरभ्र आभाळ

निरभ्र निळे नितळ नभ
अर्ध अवगुंठित  अनुपम चंद्र

फुले फुलोरा हिरवा कंच
मन निश्चळ निवांत निर्भ्रम.

पारदर्शिका :- जयदीप लिमये.
शब्द :- डॉ.सदानंद चावरे