प्रसन्न वदन गणेशा,दर्शन तव घडावे,
खिन्नत्व दैन्यत्व सारे,सत्वर विरून जावे.
चित्त भ्रम सारे,ज्ञानरूपें निवारून घ्यावे,
ध्येय ज्याचे त्याला,हृदयी स्वच्छ आकळावे.
श्रवण चिंतन वाचनें,मति प्रकाशा उजळावे,
दुर्वांकुर रस औषधे, ज्ञान पचनी पडावे.
बारीक तव नेत्रें , सूक्ष्म निरीक्षण घडावे,
मर्म सारे जीवनाचे, उलगडून समजून यावे.
ज्ञान कला कौशल्ये,मन समृद्ध बनावे,
रसमय आस्वादक रसिकतेने,सुसंस्करण नित्य घडावे.
नृत्य गायन वादनें ,जीवनी रंग भरावे,
शांत शालीन सात्विकतेने,आनंदा भरते यावे.
हाती प्रसाद मोदकाने,परीपूर्ण पोषक व्हावे,
सार्थक सा-या जीवनाचे,तव पदी नित्य रहावे.
डॉ सदानंद चावरे.
No comments:
Post a Comment