मैत्रीलाही स्तर असतात
स्वत:चे अनेक पदर असतात....
बालपणातली वेडी नाती
तशीच अवखळ आणि निरागस
स्पर्धेचे नच काटेरी कुंपण
अपेक्षांचे नसते बंधन
बिरुदे नाही पदवी नाही
मुखवट्यांचे कामही नाही
सरळसोट सारे जगणे
बुक्की मारुन निखळ हासणे
पदवी पदविकांची झूल चढता
कशी अचानक बिलगते विलगता
जाती पातींची असह्य उतरण
शोषून घेते माझे मी-पण
स्पर्धेचे रणशिंग फुंकता
इस्त्रीचे कटि वस्त्र नेसता
मन हरवते साधेपण अन्
सोडून जाते गहिरी गुंफण
येतो मग एखादा क्षण
मी माझा अन एकाकीपण
व्यवसायाचे अभेद्य कुंपण
तोंडुन भानावर येतो आपण
मूळ मैत्रीचे झुळझुळते पण
वाटे यावे पुन्हा परतुन
मैत्र जुळावे पुन्हा निरंतर
मैत्र हाच व्हावा सुस्वर
सदानंद चावरे.
१०-११-२०२०
No comments:
Post a Comment