Tuesday, February 23, 2021

करोनास...

करोनास....

एखादा सूक्ष्म जीव, पुन्हा पुन्हा येतो,
माणसांचे जीवन चक्र,पार बिघडून टाकतो.

मुखपट्टी-अंतर-स्वच्छता, ढोल वाजू लागतो,
अशाश्वताचा गूढ शब्द, मन हादरवून जातो.

मुखवट्या पल्याड चेहेरा, डोळ्यांतून बोलू लागतो,
चिंतेच्या गहि-या खुणा, देहबोलीत घेऊन येतो.

सुखे फिरणारा पाय,कुंपणातच अडकू लागतो,
आकाश विसरून पक्षी, घरट्यातच झुरू लागतो.

निरभ्र होता होता, कृष्णमेघ दाटून येतो,
सकाळीच झाकोळून जाणे,जगण्याचा भाग होतो.

सुटत आलेला प्रश्न, अकल्पित वळण घेतो,
कुठे चुकले पहायला, तपासायला भाग पाडतो.

समस्येचे नवे आयाम,शोध  सुरू होतो,
आभाळात तरंगणारे पाय, जमिनीवर घेऊन येतो.

पुन्हा नवा प्रयास,प्रवास सुरू होतो,
चिवटपणे टिकून रहाणे,हाच पुन्हा धर्म होतो.

©डॉ.सदानंद चावरे
२४-२-२०२१

No comments:

Post a Comment