क्षितिजाच्या पलिकडे...
सुदूर दिसते क्षितीज रेखा
नभात हरवून जाते
वाट दिसते कुठवर नेते
तिथवर कोणा जाता येते
ढगाळले नभ गगनी दिसते
अंधारुन का येते
प्रकाश शिंपुनी अलगद त्यावर
कोण उजळुनी जाते
डोंगर रांगा कितीक दिसती
नजर कुठवर जाते
क्षितीजाच्याही पल्याड काही
असेलसे वाटते
कोण नेईल हात धरूनी
अबोल साथ लाभते
वेणुनाद जो ऐकू येतो
तिथे जावे वाटते
मनपटलावर चित्र असे
कोण रेखीते
चित्रालाही जिवंत करणे
कुणामुळे साधते
हृदयस्पंदनी मंत्र नवेले
कोण गुंफीते
स्पंदन सरता हृदयाचेही
शांती केवळ उरते
डॉ सदानंद चावरे
No comments:
Post a Comment