अरुण उगवता क्षितिजावरती
रस रंगांची उधळण करितो
तमीं लोपल्या विश्वाला या
भूपाळीने जागे करतो
अंतरंगी जलाशयाच्या
क्षितिजावरूनी वाकुन बघतो
प्रतिबिंब तेजाचे पाडून
रजोगुणांची ऊर्जा देतो
नवतेजाचे स्वागत करण्या
कमलकलिका उमलुन येती
पुष्करणीचे दृष्य पाहुनी
मोदे रवि हा प्रदीप्त होतो
दूर वनराई आळसावलेली
प्रकाश वाटा उजळत जाती
काळोखाचे पारिपत्य होता
सळसळून सारी झाडे उठती
अज्ञानाची रात्र सरता
दिनकर हृदयी प्रज्वलित होतो
ज्ञान रुप पुष्करणीला
कमळ फुलांचा सुगंध येतो.
सदानंद
२३-१०-२०२०