प्रत्येकाची अफू निराळी....
मद्याच्या प्याल्यात कुणाला
परब्रम्हाची घडते वारी
प्रत्येकाची अफू निराळी.
हृदय सतारी सप्तसूर लागता
अस्तित्वाची जाणीव विसरी
प्रत्येकाची अफू निराळी.
कानी पडता स्वर टाळांचे
पाय नकळत नाचु लागती
प्रत्येकाची अफू निराळी.
गतप्रभृतींची वाट पुसता
जीवन कोणी अपृन टाकी
प्रत्येकाची अफू निराळी.
थोर महात्मे संत प्रभृतींचे
करती चिंतन, हननही कोणी
प्रत्येकाची अफू निराळी.
भूपाळी चे सूर ऐकता
प्रसन्न चित्त होतो कोणी
प्रत्येकाची अफू निराळी.
गडकोटांची बेलाग शिखरे
नेटाने सर करतो कोणी
प्रत्येकाची अफू निराळी.
स्वकार्यात तनमन झोकुन देता
स्वतःसही विसरे कोणी
प्रत्येकाची अफू निराळी.
ग्रंथसंपदा कुणास भावे
मना कुणाच्या कविता रिझवी
प्रत्येकाची अफू निराळी.
शरीर संपदा राखे कोणी
व्यायामाची कास धरुनी
प्रत्येकाची अफू निराळी.
शाक भाजी कुणा आवडे
सामिश भोजन करते कोणी
प्रत्येकाची अफू निराळी.
ज्याने त्याने स्वरुचीस जपणे
विविधतेचा आदर करणे
हीच अमुची असो नीती
जरी.. प्रत्येकाची अफू निराळी.
सदानंद चावरे
१-२-२०२१