Thursday, December 28, 2023

चिंतन

चिंतन २९ डिसेंबर.

२ .६ .१८ सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती |पापभय नाहीं चित्ती | तो तमोगुण ||१८||

तमोगुण म्हणजे सत्वगुणाच्या १८० अंशात विरुद्ध स्वभावाचा माणूस.सत्कर्म म्हणजे ज्या योगे स्वतःचे ,समाजाचे भले होते असे कृत्य. शाश्वत स्वरुपाचे काम.ज्या योगे आपली सत्कीर्ती मृत्यू पश्चात टिकून राहते असे कृत्य.जे कार्य संत सज्जनांना मान्य आहे,नीती शास्त्र यांच्या चौकटीत बसणारे आहे असे कर्म .
ते आपोआप घडत नाही.करावे लागते.पण त्यासाठी सकारात्मक विचार व ऊर्जा हवी.पण आळस हा तमोगुणाचे प्रधान लक्षण आहे.विपरीत विचार हाही तमोगुणी माणसाचा स्थायीभाव आहे.त्याला सत्कर्मच काय सत्कर्मी लोकही आवडत नाहीत.हिरण्यकश्यपु,असुर ही उदाहरणे आहेतच.सध्या आपण काहीतरी कुरापती काढून युद्ध प्रवण नेते जगात पाहतो आहोतच.
कायिक वाचिक व मानसिक दोष आवडतात.ज्यांची घृणा वाटायला हवी ते आवडणे ही गंभीर समस्या आहे.चूक दुरुस्त करता येईल पण जर तसेच वागणे आवडत असेल तर मात्र कठीण आहे.हाताबाहेर गेलेली केस असे म्हणावे लागेल.पण समर्थांसारखे संत मात्र अशांना ही मार्गावर आणतात.वाल्या कोळ्याला दरोडा घालणे आवडत होते पण केवळ एक प्रश्न विचारून नारदांनी त्याचे डोळे उघडले.देहबुद्धी आत्मबुद्धी करायचा शाश्वत मार्ग सांगितला.म्हणजे त्यागार्थ सांगीतलेला हा तमोगुण कसा सोडवायचा याचा उपाय सद्गुरू जाणतात.

माणूस चुकीचे काम करण्यापासून परावृत्त होण्यासाठी पाप हातून घडेल ही भीती महत्वाची असते.आपल्या पापात वाटेकरी व्हायला कोणी तयार नाही.हे महापाप आपल्याच माथी येणार ही उघड उघड भीतीच तर होती.तिने काम केले‌.वाल्याचा वाल्मिकी झाला.पण हिरण्यकश्यपू कडे हे भयही वाटू नये इतका मोठा बलाचा अहंकार होता.देवाचा सज्जनांचा तिरस्कार होता.काय घडले? दारुण मरण आले.

समर्थ आपल्याला बोध करत आहेत की या पैकी काही आपल्या अंतरंगात शिरले असेल तर वेळीच सावध व्हा.दुर्गुणाचा वृक्ष होण्या पूर्वी च स्वपरीक्षा करा.शक्य नसेल तर संतांना शरण जा.ते तुमचा वृत्तीदोष खात्रीने घालवून देतील हा विश्वास बाळगा व लवकर कृतीशील व्हा.

जय जय रघुवीर समर्थ.

Wednesday, December 27, 2023

शाळा

शाळा मदीय स्मरते,नित्य हृदयांतरी|
खेळलो बागडलो इथे, मुक्त पाखरापरी ||१||

स्वजन मिळाले इथे, जिवलग मित्रांपरी |
स्वहित कळाले जिथे,सहज शिक्षणातुनी||२||

शिक्षक विद्वद्जन भेटले, अर्थ भरती अक्षरी|
ताडिले क्वचित कारणी,प्रेम अधिक देऊनी ||३||

सरता बाल्य शाळा सरली,उरली मनी साजिरी |
हृदयी नित्य भरते अजुनी,हळवी जाग राहिली ||४||

बोलाविते ती अजुनही, वर्षे बहु जाहली|
अंकी तिच्या वाटते,धाव घ्यावी खेळुनी||५||

डॉ सदानंद अरुण चावरे.
नूमवीय १९८४ दहावी अ.

शाळा

शाळा मदीय स्मरते,नित्य हृदयांतरी|
खेळलो बागडलो इथे, मुक्त पाखरापरी ||१||

स्वजन मिळाले इथे, जिवलग मित्रांपरी |
स्वहित कळाले जिथे,सहज शिक्षणातुनी||२||

शिक्षक विद्वद्जन भेटले, अर्थ भरती अक्षरी|
ताडिले क्वचित कारणी,प्रेम अधिक देऊनी ||३||

सरता बाल्य शाळा सरली,उरली मनी साजिरी |
हृदयी नित्य भरते अजुनी,हळवी जाग राहिली ||४||

बोलाविते ती अजुनही, वर्षे बहु जाहली|
अंकी तिच्या वाटते,धाव घ्यावी खेळुनी||५||

डॉ सदानंद अरुण चावरे.
नूमवीय १९८४ दहावी अ.

Datta Prabhu

दत्त प्रभू...

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
त्र्यैमूर्तीचे रूप मनोहर
अनुसूया सुत अत्रि नंदन 
उद्धराया जन आले भूवर |

सत्व रज तम त्रिगुणात्मक
त्रिभुवन चालक परम हितकारक
पालक तारक अन् संहारक 
सिद्ध मुनींचे तप संरक्षक |

तेजोमय हे प्रसन्न दर्शन 
कृपा वर्षितो हा करुणा घन
दिसे मुख हे सात्विक सुंदर
नेत्री भावहे मंगल पावन |

डॉ सदानंद चावरे पुणे.
२७-१२-२०२३