Sunday, December 26, 2021

Happy New Year

गत वर्षाला निरोप देता....

गत वर्षाला निरोप देता, मोरपिसा सम हलके व्हावे
स्वप्न गोजिरे मनास व्यापून,जीवन सन्मुख व्हावे.

गोड कटु जरी आठवणींचा,पैस व्यापिला असे,
जीवन सरीते मधे समर्पण, अर्घ्य देत निघावे.

क्षण सुगंधित केले त्यांना,मनी कृतज्ञ उरावे, 
वेदनांचे असतील कढ  तर,शांत करीत निघावे.

नव वर्षाचे किरण पसरता,चैतन्याने बहरत यावे,
शुभचिंतन हे कुसुम दलांसम,मधु गंधित व्हावे.

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
डॉ सदानंद चावरे
डॉ. शुभदा चावरे
कु. कल्याणी चावरे
२७-१२-२०२१

Sunday, December 19, 2021

कालिया मर्दन

षड्विकार....

जीवनाचा डोह बनता,साचते कालकूट
फूत्कार संचित भावनांचे,व्यापिती आसमंत.

निर्मळ जीवन निर्झर,जेव्हा बने जीवघेणा
फडा कालीयाचा,भिववीतसे हृदया.

जीवन नौका बुडू लागे,खळवृत्ती प्रबळ
अंतरीच्या कृष्णा यावे,धावुनिया सत्वर.

आदी अंत वासनेचा, शोधुनी तत्काळ
दमन करावे सर्पाचे, करून विश्व नर्तन.

काम क्रोध दंभ ,मद मोह मत्सर
रिपु दमन शमनार्थ ,घडे कालिया मर्दन.

डॉ सदानंद चावरे पुणे
२०-१२-२०२१

Saturday, December 18, 2021

दत्त जयंती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त अवधूत
जगा उद्धराया झाले अवतरित.

ब्रह्मा महेश विष्णु एका देहात
परब्रह्माची जणू लीला अद्भूत.

शंख चक्र गदा हाती घेऊन
गोवत्सल दिसे प्रेमळ स्वरूप.

तप: पूत कांती सद्गुरू स्थान
सकल भक्तीचे निर्मळ निधान.

ऋषीजन मुनी नाथ संप्रदाय
मोक्षदायक निजानंद धाम.

डॉ.सदानंद चावरे 
१८-१२-२०२१

Saturday, December 11, 2021

राधा हरी

मधु मुरलीच्या मुग्ध स्वरांनी,राधा हरीचे सगुण संकीर्तन,
जीवा शिवाचे अतूट नाते,मनी स्मरावे सतत निरंजन.

सृष्टीचे जे अमूर्त नर्तन,लय तालांचे अमृत मंथन,
सप्तसुरांची एक बासरी,अविरत प्रकटे एकच गायन.

मूर्ती दडले अमूर्त चिरंतन,व्हावे आम्हा थोडे आकलन,
चित्रा मधले भाव निरखता,हातून घडले थोडे लेखन.

सदानंद चावरे.
१२-१२-२०२१