Sunday, November 29, 2020

Faith... Trust..

विश्र्वास... Faith.. Trust..श्रद्धा.

जिवंत रहाण्यासाठी आवश्यक अशा श्वासा बदल जो विश्र्वास 
तितपत नि:शंक मनाने जेव्हा आपण एखाद्या बद्दल आश्वस्त असतो तो विश्र्वास.

विश्वस्त हा आणखी एक शब्द.यात संपूर्ण जबाबदारी तर आहे पण उपभोगाबद्दल अलिप्तता आहे. 'इदन्न मम ' असा भाव.विश्वस्ताबद्दल विश्र्वास असायला हवा व त्याने तो जपायलाही हवा.

मित्रांचा एकमेकांवर विश्वास, पतीचा पत्नीवर विश्र्वास ,गुरुचा आपल्या शिष्यांप्रती विश्वास तसेच भक्ताचा देवावर विश्वास अशी काही उदाहरणे देता येतील.या नात्यांना विश्वासाचा धागा धरून ठेवतो.नव्हे तो या नात्यांचा आधारच असतो.संदेह,किंतू हे या नात्यांना कमकुवत करतात.

प्रत्येक नातं हे काही अपेक्षांवर आधारीत असतं. जेवढी अपेक्षा पूर्ती तेवढी वीण घट्ट.तेवढा विश्र्वास पक्का. पण यात एक धोका आहे. अपेक्षा अपेक्षेइतक्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र नात्यांचा डोलारा डगमगू शकेल.

ईश्र्वर आणी भक्त हे नातं थोडं निराळं.प्रभूची इच्छा म्हटलं की तो ठेवेल तसं. स्वत:ला चक्क वजा करायचं.चांगली परिस्थिती आली तर ती त्याची कृपा आणि वाईट परिस्थिती आली तरी त्याची इच्छा.असं समर्पण असेल तर मग अपेक्षांचे ओझे हे नाते वागवीत नाही.मोकळा संवाद.द्वंद्व संपलं की संघर्ष संपला.जगाशी आणि स्वत:शी देखील.

विश्वासात समर्पण व शरणत्वही आहे. विसर्जित करायला जे अवघड असते ते 'मी' पण इथे विराम पावते.द्वंद्व, दुविधा,संशय हे सगळे समूळ नष्ट होतील कारण मनातून 'मी' चा लोप झाल्यावर फक्त संपूर्ण शरणागत विश्वास सर्व भावनांची जागा घेऊन मनाचे अवकाश व्यापून टाकेल. 

Trust , Faith विश्वास , श्रद्धा हे खूप जवळ जवळ अर्थ छटा असणारे शब्द आहेत. तरीही थोडे थोडे वेगळे. श्रद्धा असेल तर विश्र्वास असेलच. श्रद्धेला तडा गेला तर विश्र्वास उरणार नाही. पण एखाद्या वर विश्र्वास असेल तर श्रद्धा असेलच असे नाही.श्रद्धा बसण्याआधी कितीतरी अनुभवातून विश्र्वास पक्का होत जावा लागतो. अतीव विश्र्वास श्रद्धेत परावर्तीत होत असावा. ज्या व्यक्तीवर श्रद्धा आहे तिचे वर्तन अपेक्षेपेक्षा खूप निराळे गैर घडले तर मात्र प्रथम श्रद्धा व नंतर विश्र्वास ढासळू शकेल.

जयजय रघुवीर समर्थ.
डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०

No comments:

Post a Comment