रामायणातील नावे खूप अर्थपूर्ण आहेत.
दशरथ - दहा घोड्यांचा रथ, ज्याचे शरीराच्या दहा इंद्रियजनित विकारांवर पूर्ण नियंत्रण आहे असा जित इंद्रिय पिता.
कौसल्या- कोसल देशीची राजकन्या.कसला तरी सल मनात सहन करणारी सोशिक स्त्री. तो सल सवतींच्या असण्याचा, त्यांच्या वर्तनाचा, दीर्घ कालपर्यंत पुत्रप्राप्ती न झाल्याचा असू शकेल. रामजन्म हा त्या सर्वांवरील रामबाण उपाय .
सुमित्रा:- जगाशी मैत्री पूर्ण नाते राखणारी राजस्त्री.कौसल्या व केकयी यांची व्यक्तीमत्वे प्रसंगोपात्त समजतात . पण सुमित्रा लक्षमणाची आई ही एक ओळख सोडली तर वेगळी ओळख बाळगताना दिसत नाही. इतकी ती मिसळून गेली आहे.
कैकयी:- अनेक व्रते वैकल्ये चिकाटीने करणारी कणखर व बलशाली स्त्री. दशरथाला विजयश्री मिळवून देण्यासाठी अक्षरशः 'हातभार' लावणारी महान लढवैय्यी.
अशा थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेली मुले..
राम:- अखिल विश्र्वाचे विश्राम धाम ,निवासाचे हक्काचे आधाराचे ठिकाण म्हणजे राम.सुरवातही राम, अंतही राम असा अनादि अनंत राम.
लक्ष्मण:- ज्याच्या मनाचे लक्ष केवळ श्रीराम असा समर्पित जीवन जगणारा ,रामाची सावली बनून राहिला तो भ्राता.
भरत:- राम प्रेमाचे अखंड भरते आलेला, भक्तीरस सागर भरत.
शत्रुघ्न:- शत्रूंसाठी थरकाप उडवणारा त्यांना जिंकणारा परम प्रतापी भ्राता. माणसाच्या जीवनात बाह्य शत्रूंपेक्षाही बलशाली असतात ते भाव भावना व विकार रूपी शत्रू. त्यांच्यावर विजय मिळवायचा तर राम निकट संन्निध्य आवश्यक. भरत संन्यस्त वृत्तीने रहात असताना अयोध्या रक्षणाची जबाबदारी पार पाडणारा शत्रुघ्न.
मंत्री सुमंत:- ज्या राज्याचा मंत्री स्थिर मति, सु मति असणारा व स्वामी निष्ठ आहे ते राज्य अजिंक्य रहाणार हे सुनिश्चित व त्या राजाला सतत योग्य सल्ला मिळणेही स्वाभाविकच. आपल्या शरीरात सद् सद् विवेक बुद्धी ही मंत्रीवर सुमंताचे कार्य करीत रहावी.
सुग्रीव, मारुती,जांबुवंत ,जटायू हे निरनिराळ्या प्राणी जमातीतील लोक, राजकुलीन लोकां इतकेच गंगा किना-यावरील केवट, आदिवासी या सर्वांशी रामाचे सख्य व छोट्या खारी सकट सगळ्यांचा राम कार्यात सक्रिय सहभाग हे सगळं सूचक आहे. भगवंताचे सर्वांशी भूतमात्रांशी जोडलेले असणे खूप लोभस व आश्वासक आहे. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकतो असा भक्तांना दिलासा देणारे आहे.प्रभू पदाशी कोणताच भेदभाव नाही हे सुचविणारे आहे.
श्रीराम- जानकी हे तर अद्वैतच. संपूर्ण जगाचं जनकत्व पालकत्व असलेलं अर्ध नारी नटेश्वराचं स्वरूप. सीता हे स्त्रीच्या सौशीकतेचं, सहनशीलतेचं,सुसंस्कृततेचं ,पतीवरील एकनिष्ठ अदम्य विश्वासाचं परमोच्च दर्शन.
रावणाच्या पक्षातही बिभिषण,मंदोदरी हे सत्प्रवृत्त लोक .राक्षस कुळाचे असूनही श्रीरामांचे अवतार स्वरूप उमजलेले.
या उलट महान शिवभक्त असूनही मद मोह व अहंकार यांच्या पायी स्वहित पराङमुख रावण.याच्या जवळ काय नव्हतं? धैर्य शौर्य,अपार शक्ती. पण भगवंताचे वर मिळूनही पथभ्रष्ट झाला व स्वत:च्या व लंकेच्या विनाशाला कारण झाला.इंद्रजित रावणाचा मुलगा. तेजस्वी,शूर पण वारसा हक्काने आलेल्या दंभाने त्याचा बळी घेतला. त्यानेही उग्र तपश्चर्या केली होती व या अर्थाने तो रावणाचा वारस ठरतो.
रामायणातील पात्रे ही उत्तम गुण व दुर्गुण यांचे मिश्रण आहेत.कुठल्या गुणांचे प्राबल्य आहे त्यावर तुम्ही कुठल्या पक्षाचे ते ठरते. आपल्या जीवनात तरी काय वेगळे घडते?
सुग्रीव म्हणजे ज्याचा आपल्या जिभेवर ताबा आहे.बराचसा सात्त्विक प्रवृत्तीचा.पण रावणाला गवाक्षात उभा पाहून क्रोध अनावर झाल्याने उड्डाण करून सेनापतीला अशोभनीय धाडस करतो तेव्हा बुद्धी वर हृदयाचे प्राबल्य दिसून येते. या दु:साहसाबद्दल त्याला कान उघडणीही ऐकावी लागते.
तात्पर्य रामकथा बोधप्रद वाटते, कारण त्यातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्ती आपल्यातही दिसतात.आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आपल्या वृत्तींवर प्रकाश टाकण्याची,त्या बाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य राम कथेत आहे हे नक्की.रामायण मानवी जीवनात आदर्श मूल्यांची प्राणप्रतिष्ठापना करताना दिसतं तर महाभारत हे व्यवहार व आदर्श यांच्यात समतोल साधायच्या प्रयत्नात दिसतं.त्यामुळे महाभारत हे आणखी विशाल पट व्यापताना दिसतं. तोपर्यंत होऊन गेलेल्या मनुष्य जीवनातल्या ब-या वाईट अनुभवांच्या समुद्राचं मंथन करून गीताख्य अमृत पुन्हा नवे आदर्श ठरवून देताना दिसतं. ही एक नव्याने वैचारिक मांडणी असावी.
डॉ सदानंद चावरे
१-१२-२०२०