Tuesday, November 4, 2025

अभंग तुकाराम...

अभंग तुकारामच्या निमित्ताने...

अभंग तुकाराम या सिनेमाचा निर्माते सुप्रसिद्ध दिग्दर्शक आ.श्री.दिग्पाल लांजेकर सरांनी सर्व कलाकारांच्या उपस्थितीत ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी पुण्यात कोथरूड सिटिप्राईड येथे   आयोजित केलेल्या दिमाखदार प्रदर्शन सोहोळ्याला उपस्थित राहाण्याचे भाग्य लाभले. सिनेमागृहाचे वातावरणच तुकोबांच्या सात्विक भक्तीभावाने भरुन गेले होते. सर्वांना नाम काढला जात होता ,आळंदी व देहू संस्थानचे प्रतिनिधी आशिर्वाद द्यायला उपस्थित होते.त्यामुळे वारीचे वातावरण पुन्हा अनुभवायला मिळाले.

अभंग तुकाराम या सिनेमातील केंद्रीय भूमिका तुकोबांचे अभंग हीच आहे.सर्व कलाकारांनी आपापली भूमिका समरसून साकारली आहे.कलाकार निराळा उरत नाही हे दिग्दर्शकाचे यश आहे. संहिता सशक्त आहे. संवाद उत्तम आहेत.संगीत व प्रकाश योजना प्रभावीपणे वापरल्याने अतिशय परिणामकारक आहेत.तुकोबांचे चरित्र माहिती नाही असे महाराष्ट्रात कोणी आढळणार नाहीत पण ते सर्व जेव्हा दृकश्राव्य होऊन येते तेव्हा सजीव प्रत्यक्ष अनुभव देते. इतर प्रांतीय व परदेशीय प्रेक्षकांची सोय म्हणून English subtitles येतात व त्यांचे शब्दांकन अतिशय नेमके व सुयोग्य झाले आहे.समजायला सोपे झाले आहे.

चित्रिकरण चांगलं झालं आहे.तुकोबांच्या काळात घेऊन जाते. तुकोबांची भूमिका करणारे श्री योगेश सोमण आणि अवलीची भूमिका करणा-या स्मिताताई शेवाळे यांच्या भूमिका संस्मरणीय झाल्या आहेत. देवत्वाच्या वलयात असलेले मनुष्य भाव अतिशय उत्तम कायिक व वाचिक अभिनयाने साकारले आहेत.मंबाजी बुवा रामेश्वर भट यांच्या भूमिका सुद्धा उत्तम आहेत.जिजाऊ, शिवराय, ज्ञानदेव याही भूमिका अतिशय उत्तम झाल्या आहेत. बालचमू, तुकाराम महाराजांच्या भोवती तल्लीन होऊन नाचणारे गाणारे भक्त यामुळे अभंग अतिशय अर्थपूर्ण व भावगहिरे झाले आहेत.

तुकोबांच्या अभंगांचा अर्थ पोहोचवणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर या प्रतिभेचा गाभा,काव्यनिर्मितीचा उगम समजून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, तुकाराम महाराजांचे भावविभोर ब्रह्मस्वरूप आपल्या पर्यंत पोहोचवणे यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे.

त्याला व्यावसायिक यशही उत्तम लाभो ही श्रीचरणी प्रार्थना.
रामकृष्ण हरि.रामकृष्ण हरि.

डॉ.सदानंद चावरे,पुणे.
४-११-२०२५

Wednesday, March 12, 2025

Holi

होळी...

चेतवूनही पणती इवली,अंधार सरला नाही|
जमवुन सा-या समिधा, धडाडून पेटवू होळी||१||

स्वातंत्र्य मिळावे म्हणुनी, धारातीर्थी पडले काही|
स्मरण तयांचे करुनी, धडाडून पेटवू होळी||२||

अन्यायी अत्याचारी अभिलाशी,मुक्त कसे फिरताती|
मुसक्या त्यांच्या आवळूनी, धडाडून पेटवू होळी||३||

 महन्मंगल ते ते स्मरुनी,सज्जनांची बांधू मोळी|
अमंगल सारे झाडून, धडाडून पेटवू होळी||४||

पात्री पुरणाची पोळी,हात राबती शेतीघरटी |
स्मरण त्यांचे ठेवुनी, धडाडून पेटवू होळी ||५|

क्षीण होतसे ठिणगी,ज्योत पुन्हा उसळावी|
दौर्बल्य आळस झटकुनी, धडाडून पेटवू होळी||६||

हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

जय जय रघुवीर समर्थ.
डॉ सदानंद चावरे.
१३-०३-२०२५