प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढ वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडू नय तो।
जनीं तोच तो मानवी धन्य होतो॥३॥
Morning , beginning of a day,is auspicious pious time. Best to start a day remembering God. Before even voice generates, let mind recite His name.
राम नाम हाच सदाचार.तो सोडायचा नाही. ते व्रत सांडायचं नाही.सत् आचार - चांगलं वर्तन.म्हणजे काय ते आधीच्या श्लोकात सांगितले आहे- जनी वंद्य ते सर्व भावे करावे. समाज रीतीला धरून व्यवहार असेल असा माणूस लोक मान्यता मिळवतो लोक त्याला नावाजतात.
प्रभात म्हणजे दिवसाची सुरुवात.रात्रीचा अंधार सरून प्रकाश भरून रहाण्याची वेळ.रात्र ही अज्ञानाचे प्रतीक आहे.ज्ञान प्रकाशाचे.उष:काल संधीकालही असतो.तशीच संध्याकाळही.म्हणून संध्या अग्निहोत्र अशा साधना दोन संधीकाली केल्या जातात.
वैखरीने इतर प्रापंचिक गोष्टी उच्चारण्यापूर्वी रामनामाने सुरुवात करायची.अन्यथा इतक्या गोष्टी बोलायला सापडतील की त्यात साधे सोपे फुकट असलेले नाम घ्यायची आठवण आपल्याला रहाणार नाही.आपल्या मनाच्या या खोड्या समर्थ ओळखून आहेत.म्हणून मनाला अशी सवय लागली की कोणताही शब्द उच्चारण्यापूर्वी रामनाम मनात ,हृदयात घुमावे.आपोआप घुमावे.ही सवय लागली की अजपा जप आपोआप होऊ लागतो हे मनाचे सामर्थ्य आहे त्याचा सदुपयोग करून घ्यायची आहे.म्हणून तर समर्थ मनाला मना ' सज्जना' असे म्हणून त्याचे कौतुक करतात.
कोणता सदाचार सोडायचा नाही? तर प्रभाती सुरुवात राम नाम जपाने करायची.असे जो करील तो मानवी धन्य होतो म्हणजे लोकांमधे वंदनीय ठरतो, अनुकरणीय ठरतो हा एक भाग आणि ज्यांच्या मनाचे लगाम बुद्धी चे नियंत्रण प्रभू राम करतात त्यांचे जीवन प्रभू कारणी लागते.त्याच्या इच्छेने सारे घडू लागले की जे त्या जीवासाठी, समाजासाठी,विश्वासाठी हितकारक असेल तेच घडेल.
मानवी धन्य होणे याचा आणखी एक अर्थ म्हणजे ज्या हेतूंसाठी मानवी जन्म मिळाला,ते साध्य होणे.मानवी जन्माचे साध्य म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होणे, अद्वैत साधणे,ईश्वराची एकरूप होणे.
हे सगळे साध्य होण्याचे सोपे साधन , परिणामकारक साधन म्हणजे नामसाधना.म्हणून प्रभाती रामनामाचा जप करण्याचा सदाचार अंगी बाणव असा समर्थांचा मनाला म्हणजे आपण सर्वांना आग्रह आहे.
मनोबोधातला हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा असून उपासनेची दिशा निश्चित सांगणारा आहे.समर्थांच्या साधनेचा,स्वरूप साक्षात्काराचे सामर्थ्य या श्लोकामागे उभे आहे.
डॉ सदानंद चावरे पुणे.