Tuesday, September 22, 2020

पूर्व क्षितीज

रक्त लालीमा 
पूर्व दिशेला
कोण उधळितो
गुलाल ताजा

अलगद पुसतो
अंधार रात्रीचा
कोण उजळितो
कुंद नभाला

सहज जाता 
नजर बाहेरी
कोण तोषवितो
मना मनाला

© डॉ सदानंद चावरे
२३-९-२०२०

Monday, September 14, 2020

engineers Day

अभियांत्रिकीच्या तज्ञांस.....

यंत्र निर्मुनी कार्य साधता
कष्ट जगाचे सुकर करता
प्रगतीचे नव विश्व घडवता

अधुनिकतेचा वसा घेऊनी
नव्या जगासी तुम्ही निर्मिता
प्रगतीचे सोपान घडवता

कल्पना ज्या मानव करितो
प्रत्यक्षामधे तुम्ही आणता
वंदनीय ही कृतीशीलता

शास्त्र तंत्रज्ञानी मिसळुनी
उपयुक्ततेचा ध्यास घेता
अर्थ निर्मिता कार्य निर्मिता
रथ विश्वाचा गतीमान करता

Happy Engineer's Day
©Dr. Sadanand Chavare

Wednesday, September 9, 2020

मागणे

मागणे...

हाता मधे टाळ दे
मुखासाठी नाम दे
देवा तुझ्या भक्तीसाठी
थोडा तरी भाव दे

राम नामी ठाव दे
चित्ती समाधान दे
संघर्ष हे पेलण्याला
थोडे अवसान दे

वृत्तीचे रे भान दे
बुद्धीचेही दान दे
झिजण्यासी कुडीला तू
चंदनी वरदान दे

संकटांसी मात दे
थोडासा श्र्वास दे
त्रासलेल्या माझ्या लोकां
आरोग्याचा घास दे

© डॉ सदानंद चावरे
९-९-२०२०

Thursday, September 3, 2020

मैत्री

मैत्री

मैत्री म्हणावे कशाला
कशी भेट होई
कोणती वेळ कधी
जुळूनी येई

फळापरी मैत्री सुद्धा
परिपक्व होई
संवेदना सहवेदना
बनुनी जाई

कधी गप्पांचे फड
कधी गाण्याची लकेर
जीवन संगीत
फुलवून जाई

वाट चालता चालता
महावाट होई 
प्रवास सुखाचा
घडवून जाई

डॉ सदानंद चावरे
३-९-२०२०